'नापास मुलांची गोष्ट ' पुस्तक परिक्षण - अनिकेत कांबळे
प्रथम वर्ष बी.ए अभ्यासक्रमाच्या निमित्ताने 'नापास मुलांची गोष्ट' हे पुस्तक वाचनात आले . अत्यंत उत्कृष्ट आणि प्रत्येकाने वाचावे असे हे पुस्तक आहे. ऋतुरंग प्रकाशनाच्या या पुस्तकाचे संपादन अरुण शेवते यांनी केले आहे.
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हा सुविचार आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत आणि अगदी आजही मनाला उभारी देण्यासाठी आपण रोजच्या जीवनात तो मनात घोळवत असतो. हेच सुवचन काही थोर व्यक्तींच्या जीवनात कसं खरं ठरलं आणि ते आज आपले आदर्श कसे ठरले याचा थोडक्यात आढावा या पुस्तकात आहे..
आजच्या स्पर्धेच्या युगात स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकजण संघर्ष करत आहे.त्यात काही यशस्वी होतात तर काही अपयशी.मग हे अपयशी निराशेच्या गर्ततेत अडकून जातात.हताश होऊन प्रयत्न करणं सोडून देतात.स्वप्न सोडून देतात.मार्ग भरकटतात.काही तर जगणंही सोडून देतात.
दहावी बारावीच्या निकालानंतर आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच्या बातम्या आपल्या कानावर ये असतात.अशावेळी श्री.अरुण शेवते यांचे हे संपादीत पुस्तक वाचले तर नक्कीच विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल की अपयशाने खचून न जाता जर नव्या उमेदीने प्रयत्न केले तर नक्कीच यश मिळते.
या पुस्तकात मोठे मोठे आदर्श दिगग्ज शाळेच्या परीक्षेत नापास झाले तरी त्यांनी जीवनाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे याचे वर्णन आहे.अर्थात यामागे त्यांची मेहनत, चिकाटी, कलागुण आणि हार न मानण्याची वृत्ती दिसून येते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी, आइन्स्टाइन, जे.कृष्णमूर्ती, विस्टन चर्चिल, लोकमान्य टिळक, अगस्त्यु रोद, रामानुजन, इंदिरा गांधी, राजकपूर, यशवंतराव चव्हाण, कुसुमाग्रज, दया पवार, ना. सी.फडके, आर.के.नारायण, सी रामचंद्र,शांता शेळके, आर.के.लक्ष्मण, गुलजार, सुशीलकुमार शिंदे,
चंद्रशेखर धर्माधिकारी, जयंत साळगावकर, नरेंद्र जाधव, यशवंतराव गडाख, लक्ष्मण माने, वाय.सी.पवार या साऱ्या महान लोकांनी अपयशाचे दुःख चाखले आहे. पण त्याने तोंड कडू न करता प्रयत्नपूर्वक यशाच्या गोड फळांचा मागोवा घेतला आहे.आणि आपल्या क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवला आहे.
उदाहरणार्थ ग.दि.माडगूळकरांना आपण पदवीधर नाही याचं दुःख वाटायचं पण आज कित्येक पदवीधर त्यांच्या साहित्याचा अभ्यास करत आहेत. कोणत्याही पदवीधरापेक्षा अफाट प्रतिभा, बुद्धी व भाषाप्रभुत्वाचा ठेवा त्यांच्या जवळ होता.
या पुस्तकाची भाषा भावपर असून त्यात कृत्रिमता जाणवत नाही.समजण्यास अत्यांत सोपी आहे.तसेच प्रत्येक लेखाच्या टिपणीत तो लेख कोठून मिळवला याचा उल्लेख आहे.त्यामुळे संदर्भ समजण्यास मदत होते.
मुखपृष्ठावर पुस्तकाचे शीर्षक व आदर्श व्यक्तींची छायाचित्रे आहेत.
मलपृष्ठावरही छायाचित्रे व पुस्तकाचा सारांश आहे.शेवटच्या चार पृष्ठांवर नापास मुलांचे प्रगतीपुस्तक आहे.त्यामुळे संपूर्ण पुस्तकाचा तपशील पुन्हा एकदा नजरेसमोर उभा राहतो.
त्यामुळे वाचकांच्या मनात येणाऱ्या अपयशाने खचून न जाता आपल्या कलागुणांसह पुन्हा नव्याने सुरवात करण्याची सकारात्मक प्रेरणा निर्माण होते. ध्येयाने प्रेरित असणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक एकदातरी नक्की वाचावे.
पुस्तक परीक्षण: अनिकेत कांबळे
पुस्तकप्रेमी
Comments
Post a Comment